वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल

हत्याकांडातील साक्षिदाराचे अपहरण-धमकी प्रकरण

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
nagpur-news : उमरेडमधील शुभम दमडू हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षिदाराने न्यायालयात साक्ष बदलावी यासाठी चौघांनी त्याचे अपहरण केले. त्याला रात्रभर डांबून ठेवले आणि त्याला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर उमरेड पोलिसांनी गुन्हे दाखल करुन चौघांना अटक केली आहे. ॲड. रमेश रावलानी, राकेश महाकाळकर, प्रद्युम्न कोरटकर आणि अक्षय पाटील अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
 
 

KL
 
 
 
उमरेडचे ठाणेदार धनाजी जळक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२२ मध्ये शुभम दमडू या युवकाचा उमरेडमध्ये रोशन कारगावकर आणि बादल लेंडे यांनी खून केला. या हत्याकांडात अरुण नावाचा युवक प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहे. तो पेंटींगची कामे करतो. २८ जुलैला रात्री सात वाजता अरुणच्या घरी राकेश महाकाळकर, प्रद्युम्न कोरटकर आणि अक्षय पाटील हे तिघे आले. त्यांनी अरुणला कारमध्ये कोंबले आणि घेऊन गेले. त्याला रानबोडी गावातील एका शेतात नेले. तेथे त्याला मारहाण केली आणि रात्रभर डांबून ठेवले. त्याला हत्याकांडात साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्याला मारहाण केली आणि साक्ष दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी नागपूर येथे न्यायालयात घेऊन आले. त्याला ॲड. रावलानी यांनी साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर अरुण यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, अरुण यांनी न्यायधीशांना घडलेली हकीकत सांगितली. चारही आरोपींनी अपहरण, शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याजी धमकी दिल्याचे न्यायधीशांना सांगितले. त्यामुळे न्यायालयाने हा प्रकार गांभीर्याने घेत आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. उमरेड पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.