जुन्या वाहनधारकांसाठी शेवटची संधी!

परिवहन मंत्र्यांचा स्पष्ट इशारा

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Last chance for owners of older vehicles राज्यातील सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य असून, ३१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. मुदतीनंतर एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर नियमांनुसार कारवाई केली जाईल आणि त्यात कोणालाही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, साध्या नंबर प्लेटचा वापर करून गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे वाहनांची ओळख पटविणे सुलभ होणार असून तपास यंत्रणांनाही मदत मिळणार आहे.
 
 
palate
 
राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे एक कोटी वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. नवीन वाहनांना शोरूममधूनच एचएसआरपी प्लेट दिली जाते. मात्र, जुन्या वाहनांपैकी केवळ ५५ ते ५६ टक्के वाहनधारकांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली असून उर्वरित वाहनधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.एचएसआरपीच्या नियमातून मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी वगळले जाणार नसल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींनाही हा नियम लागू राहणार असून, मुदत संपल्यानंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर समान पद्धतीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. परिवहन विभागाने सर्व वाहनधारकांना वेळेत एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन केले असून, ३१ डिसेंबरनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणताही भेदभाव न करता कारवाई केली जाणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी पुन्हा स्पष्ट केले.