वेगळ्या विदर्भासाठी नागपुरात लाँगमार्च

अॅड. वामन चटप यांची पत्रपरिषदेत माहिती

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
long-march-in-nagpur : विदर्भ राज्य आंदोलन समितीने ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळवणारच, या निश्चयाने विदर्भातील अकराही जिल्ह्यातील गावागावांत व शहरात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा लाँगमार्च काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अॅड. वामन चटप यांनी आज गुरुवार ३० रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
jkl
 
 
 
नागपुरातील जनतेत विदर्भाच्या मागणीची तिव्रता जाणवून देण्याच्या हेतूने हा लाँगमार्च आयोजित केला असून दुपारी १.३० वाजता लाँगमार्चचा समारोप व विदर्भ निर्माण जनसंकल्प जाहीर सभा संविधान चौकात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विदर्भ राज्याची मागणी रेटून धरण्यात येणार असल्याचेही अॅड. चटप यांनी सांगितले.
 
विदर्भ १०० वर्षे महाराष्ट्रात राहिला तरी विदर्भातील जनतेचा अनुशेष कदापिही भरून निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे. केंद्र सरकारने घटनेतील कलम ३ प्रमाणे राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू करून विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे, अशी मागणी १२१ वर्षांपासून तर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने मागील १४ वर्षांपासून सातत्याने करीत आहे. आतातर देशपातळीवरील नवराज्य निर्माण महासंघाने केंद्र सरकारकडे प्रथम प्राधान्याने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे, अशी मागणीही राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे केली असून सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त केला असल्याचे अॅड. चटप यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा समन्वयक मधुसूदन हरणे, अरुण केदार, मनीष दाणी आदींची उपस्थिती होती.