‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
मुंबई
drug free campaign राज्यात वाढत्या व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाची सुरुवात केली आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला राज्यभरातून विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 

maharashtra launches statewide drug free campaign under cm devendra fadnavis to fight addiction 
अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना व्यसनमुक्त समाज निर्माण करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः युवकांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर ठेवण्यासाठी जनजागृती, समुपदेशन आणि समाजाचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत नशामुक्तीची शपथ घेतली. कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करणार नाही, तसेच इतरांनाही त्यापासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करू आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सक्रिय योगदान देऊ, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.राज्य सरकारच्या या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, समुपदेशन शिबिरे, प्रबोधनपर उपक्रम आणि विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
व्यसनमुक्त, निरोगी आणि सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे अभियान राज्यभर व्यापक स्वरूपात राबविले जाणार असून, समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
 
दरम्यान, मुंबईतील ‘ड्रग्स फ्री मुंबई’ drug free campaign  अभियानाच्या धर्तीवर हे मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी BEST बस, बसथांबे आणि मेट्रो स्थानकांवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
या अभियानात सहभागी होण्यासाठी drugfreemumbai.org या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदणी करून नशामुक्तीची शपथ घेतल्यानंतर त्यांना तात्काळ डिजिटल प्रमाणपत्रही उपलब्ध होणार आहे.शाळा, महाविद्यालये, पालक, शिक्षक, आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून व्यसनमुक्त, सुरक्षित आणि निरोगी मुंबई घडविण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. तरुणाईला योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि सामाजिक पाठबळ देऊन अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.