मुंबई
maharashtra rain alert महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून, पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील वाशिम, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, नागपूर आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, 1 ऑगस्टपासून विदर्भातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, जळगाव जिल्ह्यासाठीही हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.विजांचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी शेतात झाडांचा किंवा विजेच्या खांबांचा आधार घेऊ नये, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.दुसरीकडे, कोकणातही जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसापेक्षा वाऱ्याचा जोर अधिक वाढला असून, अरबी समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पावसाला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, किनारपट्टी भागात सध्या ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बांध परिसराला अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांची छते आणि पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले आहेत.अचानक आलेल्या वेगवान वादळी वाऱ्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की, अनेक झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. राज्यात पुन्हा वाढलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.