पाकिस्तान चारही बाजूंनी घेरला?

माजी भारतीय राजदूतांचा मोठा दावा

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारताचे माजी राजदूत विद्या भूषण सोनी यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्यांच्या मते, आर्थिक अडचणी, आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित मदत न मिळणे आणि वाढता जनक्षोभ यामुळे पाकिस्तान सध्या गंभीर आव्हानांना सामोरे जात आहे.विद्या भूषण सोनी यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करून आर्थिक मदत मिळवण्याची पाकिस्तानची अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यामुळे निधीची कमतरता निर्माण झाली असून त्याचा परिणाम देशातील जनतेच्या असंतोषात होत आहे. सरकारविरोधातील भावना अधिक तीव्र होत असल्याने विविध भागांत आंदोलनांचे प्रमाण वाढल्याचा दावा त्यांनी केला.
 
 

soni 
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, बलुच संघटनांसह पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील अनेक गट आता उघडपणे सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. पाकिस्तान जगासमोर शांतताप्रिय देशाची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असला, तरी प्रत्यक्षात देशांतर्गत परिस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेचा संयम संपत चालला असून सरकारवर दबाव वाढवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरत असल्याचेही त्यांनी म्हटले.विद्या भूषण सोनी यांनी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय प्रश्नांपेक्षा स्वतःच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा, असे मत व्यक्त केले. सरकारने प्राधान्यक्रम बदलले नाहीत, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते आणि नागरिकांविरोधात कठोर कारवाईची शक्यता नाकारता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर संयुक्त आवामी कृती समिती (JKAAC) ने आपल्या अधिकृत 'एक्स' खात्यावर अनेक पोस्ट करत सुरक्षा दलांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मीरपूरमधील काही व्हिडिओंचा उल्लेख करत संघटनेने जखमींवरील उपचार, पोलिसांसोबत साध्या वेशातील मुखवटाधारी व्यक्तींची उपस्थिती आणि नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसारखी निगराणीची साधने जाणूनबुजून नष्ट करण्यात आल्याचा दावाही जेकेएएसीने केला आहे. या सर्व घटनांची संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय माध्यमे, विविध देशांचे राजनैतिक प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी स्वतंत्र, निष्पक्ष आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.