मानखुर्दमध्ये अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा हातोडा!

४६ बेकायदेशीर गाळे आणि गोदामे जमीनदोस्त

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
मुंबई,
mankhurd-unauthorized-construction : मानखुर्द परिसरातील उच्चदाब वीजवाहिनीखाली शासकीय जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या गोदामे, व्यावसायिक गाळे आणि उपाहारगृहांवर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या संयुक्त मोहिमेत तब्बल ४६ अनधिकृत बांधकामे पूर्णपणे पाडून टाकण्यात आली आहेत.
 
 
mankhurd-unauthorized-construction
 
 
सायन-पनवेल मुख्य महामार्गालगतच्या ट्रॉम्बे वाहतूक चौकीसमोरील परिसरात टाटा पॉवरच्या उच्चदाब वीजवाहिनीखाली शासकीय जागेवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर विविध व्यावसायिक दुकाने आणि उपाहारगृहे थाटण्यात आली होती. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला होता. या बेकायदेशीर बांधकामांची गंभीर दखल घेत महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम आखून ही मोठी कारवाई पार पाडली.
 
अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच कडक पोलीस बंदोबस्तात हे निष्कासनाचे काम पार पडले. जेसीबी आणि इतर अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काही तासांतच ही सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे अतिक्रमणदारांचे धाबे दणाणले आहेत.
 
शासकीय जमिनी बळकावून अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर इथून पुढेही कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. धोकादायक आणि बेकायदेशीर बांधकामांविरोधात राबवली जाणारी ही मोहीम येत्या काळात अधिक तीव्र केली जाईल, असेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.