मालेगाव,
malegaon शहरातील संतोषी माता कॉलनी परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश करत ४ लाख ७ हजार ४३६ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी मालेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील दुर्गाप्रसाद मिश्रा राहणार संतोषी माता कॉलनी, मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २९ जुलै रोजी पहाटे सुमारे २.२० वाजताच्या सुमारास ते घरात झोपलेले असताना काहीतरी उघडण्याचा आवाज आल्याने ते तत्काळ बाहेर आले. त्यावेळी दोन अज्ञात चोरटे घटनास्थळावरून पळून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला आणि घरातील दिवाणातील लोखंडी पेटीत ठेवलेला ४४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार व कानातील जोड, ३९ ग्रॅम वजनाचा लांब पट्टी हार, चार कार्ला मणी तसेच ४५ हजारांची रुपयांची रोख रक्कम असा एकूण ४ लाख ७ हजार ४३६ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी अप. क्र. ४८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५(अ) व ३(५) अंतर्गत अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार पुढील तपास करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर इलेट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.