एअर इंडिया भवनावर झळकणार 'महाराष्ट्र शासन'

मुंबईत उभारत आहेत नवे मंत्रालय

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
मुंबई,
new Mantralaya in Mumbai राज्य सरकारने केंद्र सरकारकडून १,६०१ कोटी रुपयांना विकत घेतलेल्या नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया इमारतीत नवीन मंत्रालय उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. २३ मजली या गगनचुंबी इमारतीच्या २३व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे भव्य ‘सी-फेसिंग’ कार्यालय, तर २२व्या मजल्यावर अत्याधुनिक कॅबिनेट हॉल तयार केला जात आहे. या दोन्ही मजल्यांवरील कामाचा मुख्य सचिवांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात येणार असून, लवकरच येथे मंत्रिमंडळाच्या बैठका होण्याची शक्यता आहे.१९७२ मध्ये ७,५१२ चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेली ही इमारत खासगी मालकीकडे जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारशी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर दीड वर्षांपूर्वी हा व्यवहार पूर्ण झाला आणि राज्य सरकारने ही इमारत १,६०१ कोटी रुपयांना खरेदी केली. इमारतीच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी मागील अधिवेशनात १८१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
 

mantralay 
नवीन आराखड्यानुसार २३व्या मजल्यावरील ५,६११ चौरस फूट जागेत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय उभारले जात आहे. तर २२व्या मजल्यावरील १३,३६३ चौरस फूट जागेत आधुनिक सुविधांनी सुसज्ज कॅबिनेट हॉल तयार केला जात आहे. इमारतीत दोन मजली पार्किंगची व्यवस्था असून एकावेळी १५२ वाहने उभी राहू शकतील. तसेच दोन्ही बाजूंनी प्रवेशद्वार असल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या मंत्रालयात जागेअभावी अनेक शासकीय विभाग वेगवेगळ्या इमारतींमध्ये भाडेतत्त्वावर कार्यरत आहेत. यासाठी राज्य सरकारने मंत्रालय परिसरात सुमारे ९ लाख चौरस फूट जागा भाड्याने घेतली असून, त्यासाठी दरमहा सुमारे २०० कोटी रुपये खर्च करावे लागतात. नवीन इमारतीत आरोग्य भवन, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारखे महत्त्वाचे विभाग एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासन अधिक सुलभ होण्याबरोबरच शासनाचा मोठा आर्थिक खर्चही कमी होणार आहे.
एअर इंडियाच्या ताब्यात असताना इमारतीत अनेक ठिकाणी गळतीसह इतर तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही यापूर्वी पाहणी केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम सुरू असून पुढील ३ ते ४ महिन्यांत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि कॅबिनेट हॉल असलेले वरचे दोन मजले प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मुख्य सचिव स्वतः कामावर लक्ष ठेवून आहेत. इमारतीवर आता 'महाराष्ट्र शासन' असा फलकही झळकला असून, लवकरच मंत्रालयासह या नव्या प्रशासकीय केंद्रातूनही राज्याचा कारभार सुरू होणार आहे.