नाशिक
road acciednt नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्यावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मॅक्स गाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दिनेश गावित आणि कीर्ती गावित या पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश गावित हे पत्नी कीर्ती गावित आणि बहिण त्रिशा गावित यांच्यासोबत नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळगावी नवापूर तालुक्यातील प्रतापपूर येथे जात होते. त्यावेळी पिळकोस-कळवण फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीची मॅक्स गाडीशी भीषण धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिनेश आणि कीर्ती यांना प्रथम कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासोबत असलेली त्रिशा गावित गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
कीर्ती गावित या अभोणा road acciednt येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तर दिनेश गावित जलसंपदा विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यातच दिनेश आणि कीर्ती यांनी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे त्यांच्या संसाराचा दु:खद अंत झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.