जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी प्रतिनिधीत्वावर आक्षेप

प्रस्थापित गटाने घेतला धसका

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
district-bank-elections : यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील प्रतिनिधी निवडीच्या संदर्भात नव्याने वाद निर्माण झाला असून, या प्रकरणाकडे जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
 
 
KJL
 
पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पोपेश्वर भोयर यांची बहुमताने प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. त्यानुसार यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2025 ते 2030 कालावधीच्या संचालक मंडळ निवडणुकीत मतदान करण्यासाठी, तसेच संचालकपदाची उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांची पतसंस्थेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, एप्रिल 2026 मध्ये पोपेश्वर भोयर हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्या प्रतिनिधीत्वावर आक्षेप घेत अमरावती येथे संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
 
ते पतसंस्थेच्या ठेवीदार मतदारसंघातून निवडून आलेले संचालक आहेत. या मतदारसंघात कर्मचारी, बिगर कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच इतर पात्र ठेवीदार सभासदांना सदस्यत्व व निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व रद्द होऊ शकत नाही, असा त्यांचा दावा आहे. ठेवीदार मतदारसंघातून भोयर यांनी विजय मिळविला असल्यामुळे आगामी मध्यवर्ती बँक निवडणुकीत त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात. याच पार्श्वभूमीवर त्यांचे प्रतिनिधित्व रद्द करण्याच्या उद्देशाने तक्रार करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.
 
 
जिप कर्मचारी पतसंस्थेचा प्रतिनिधी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवडून जावा, अशी जिल्ह्यातील अनेक शिक्षक व कर्मचाèयांची भावना आहे. पूर्वीही पतसंस्थेच्या प्रतिनिधींना कर्मचारी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला होता. यावेळीही तीच भावना कायम असताना काहीजण त्याला हरताळ फासण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आहे.
 
 
या प्रकरणाची सुनावणी अमरावती विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, यांच्यासमोर 3 ऑगस्ट 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे. या सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे शिक्षक, कर्मचारी आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.