मुंबई,
Rahane's emotional farewell भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या भावुक व्हिडिओतून त्याने आपल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी आपल्या क्रिकेट प्रवासाचा आढावा घेताना रहाणे भावूक झाला आणि सर्वांचे आभार मानताना त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. निवृत्तीची घोषणा करताना रहाणे म्हणाला, "प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि आता माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. या खेळासाठी मी माझे सर्वस्व दिले." त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), मुंबई क्रिकेट संघटना (MCA), प्रशिक्षक, सहकारी खेळाडू, विविध आयपीएल फ्रँचायझी तसेच प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या पत्नी आणि कुटुंबीयांचे विशेष आभार मानले.

भारतासाठी रहाणेने सहा कसोटी सामन्यांत कर्णधारपद भूषवले असून त्यापैकी चार सामने भारताने जिंकले, तर दोन सामने अनिर्णित राहिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकत संस्मरणीय कामगिरी केली होती.३८ वर्षीय रहाणेने २०११ मध्ये एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर २०१३ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. जुलै २०२३ मध्ये खेळलेला कसोटी सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. २०१८ नंतर त्याला एकदिवसीय संघात संधी मिळाली नाही, तर २०१६ पासून तो टी-२० संघाबाहेर होता.
रहाणेच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला तर त्याने भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले. या कालावधीत त्याने कसोटीत ५,०७७, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,९६२ आणि टी-२० मध्ये ३७५ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १२, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ शतके नोंदली गेली आहेत. त्याच्या शांत नेतृत्वशैली, संयमी फलंदाजी आणि संघासाठीच्या योगदानामुळे भारतीय क्रिकेटमधील त्याची कारकीर्द कायम स्मरणात राहणार आहे.