मुंबई
ramayana दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण: पार्ट १’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रणबीर कपूर यांचा प्रभू श्रीराम, साई पल्लवीची सीता आणि यशचा रौद्र रावण यांचे लूक तसेच चित्रपटातील भव्य VFX यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. मात्र, या सर्व चर्चेदरम्यान चाहत्यांच्या एका नाराजीनेही लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये भगवान हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या सनी देओल यांची एकही झलक दाखवण्यात आलेली नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओल यांची निवड झाल्याची घोषणा झाल्यापासून त्यांच्या पहिल्या लूकची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. त्यामुळे ट्रेलरमध्ये त्यांची अनुपस्थिती पाहून अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले. हनुमानासारखे महत्त्वाचे पात्र ट्रेलरमध्ये का दाखवण्यात आले नाही, असा सवाल अनेकांनी केला. कलाकारांची निवड आणि VFX अप्रतिम असल्याचे कौतुक करतानाच, “हनुमान कुठे आहेत?” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर दुसऱ्या एका चाहत्याने, “चार मिनिटांच्या ट्रेलरमध्ये इतकं सगळं दाखवलं, पण सनी देओलचा हनुमान दिसलाच नाही,” असे म्हटले. आणखी एका युजरने, “पुढील भागात सनी पाजींचा हनुमान अवतार पाहायला मिळेल, अशी आशा आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
दरम्यान, दिल्लीतील भारत ramayana मंडपम येथे आयोजित ‘रामायण’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सनी देओल यांनी याविषयी भाष्य केले. ते म्हणाले, “मी चित्रपटासाठी आतापर्यंत खूप कमी शूटिंग केले आहे. अजून बराच प्रवास बाकी आहे. मला भगवान हनुमानाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी वाहेगुरूचे आभार मानतो. हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण आहे. हनुमानाची भूमिका साकारणे सोपे नाही, पण हा एक अविस्मरणीय अनुभव असेल.”सनी देओल यांच्या या वक्तव्यानंतर चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रभू श्रीरामांच्या वनवासापर्यंतची कथा मांडली जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भगवान हनुमानाचे पात्र पुढील भागात अधिक प्रभावी आणि विस्तृत स्वरूपात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.