‘रामायण पार्ट १’च्या ट्रेलरची प्रतीक्षा अखेर संपली

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
मुंबई
ramayana trailer  दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण पार्ट १’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर निर्माते नमित मल्होत्रा यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर करत चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आहे.
 

ramayana trailer release date announced: ranbir kapoor and yash starrer trailer to premiere on july 30 
मूळ नियोजनानुसार ‘रामायण’चा ट्रेलर २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही विशेष स्क्रीनिंग आणि इतर कार्यक्रमांमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता नमित मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रेलर ३० जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
नमित मल्होत्रा यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, “शुभ ब्रह्ममुहूर्तावर, गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी पहाटे ४:१५ वाजता ‘रामायण’च्या ट्रेलरसह जगभरात नव्या सकाळचे स्वागत करू,” असा संदेश देण्यात आला आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या पोस्टवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका चाहत्याने, “माझं मन तोडू नका, संपूर्ण जग थक्क होईल असं काहीतरी दाखवा… जय बजरंगबली,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. दुसऱ्या एका युजरने, “पहाटे ४:१५ वाजता उठावं लागणार,” असे लिहिले. तर आणखी एका चाहत्याने, “आता पुन्हा निराश करू नका, या ट्रेलरची खूप दिवसांपासून वाट पाहतोय,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याने काही दिवसांपूर्वी चाहते ramayana trailer  नाराज झाले होते. सोशल मीडियावर अनेकांनी निर्मात्यांवर टीकाही केली होती. मात्र, आता अधिकृत प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर चाहत्यांचा उत्साह पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे.याचदरम्यान, ‘रामायण पार्ट १’च्या ट्रेलरमधील काही क्लिप्स सोशल मीडियावर लीक झाल्याची चर्चा रंगली आहे. त्या क्लिप्सवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या, तरी अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून नेमका कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी माता सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत झळकणार असल्याने या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.