कीव,
Russian attacks on Kiev रशियाने गुरुवारी युक्रेनची राजधानी कीवसह डनिप्रो आणि क्रिव्हि रिह या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात कीवमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक लष्करी प्रशासनाच्या हवाल्याने समोर आली आहे. हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशिया मोठ्या लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याचा इशारा दिला होता. युक्रेनच्या हवाई दलाने कीववर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याचे सांगितले. तसेच रशियन लष्करी विमानांतून क्रूझ क्षेपणास्त्रांच्या अनेक फेऱ्या डागण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. पहिल्या हल्ल्यानंतर आणखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे कीवच्या दिशेने येत असल्याचा इशारा हवाई दलाने दिला.
कीवचे महापौर यांनी पुढील हल्ल्यांचा धोका कायम असल्याचे सांगत नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अलीकडेच युक्रेनमधील लष्करी मोहिमेचे समर्थन करत रशिया आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण करणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले होते. हल्ल्यापूर्वी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सामाजिक माध्यमांवरील संदेशात हवाई दलाचे कमांडर अनातोली क्रिवोनोझ्को यांच्या अहवालाचा उल्लेख करत रशियाकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. युक्रेनला अधिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांकडील पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच देशभर हवाई हल्ल्याचा इशारा असल्याने नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असेही त्यांनी सांगितले.