देवळी,
roads-in-deoli-taluka-closed : जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे नदी, नाले कोरडे पडले होते. तर पिकांनाही पावसाच्या पाण्याची नितांत गरज होती. सर्वत्र पावसाची गरज व्यक्त होत असतानाच आज गुरुवार ३० रोजी दुपारी झालेल्या पावसाने देवळी तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पुलावर पाणी आल्याने सहा रस्ते बंद करण्यात आले तर रत्नापूर, शिरपूर आणि भिडी येथील घरांमध्ये पाणी शिरले असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.

गंगापूर येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आंजी ते अंदोरी रस्ता बंद करण्यात आला आहे. सरुळ येथील यशोदा नदीच्या पुलावर पाणी असल्याने वर्धा ते राळेगाव रस्ता बंद, आलोडा येथील यशोदा नदीच्या पुलावर पाणी असल्याने आलोडा ते पुलगाव रस्ता बंद, शेंद्री येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने शेंद्री ते सोनोरा रस्ता, भोजनखेडा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भोजनखेडा ते दहेगाव रस्ता तसेच जयराम नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दिघी (बोपापूर) ते देवळी मार्ग बंद होता. तसेच रत्नापूर येथील दोन घरांत, शिरपूर येथील ४ तर भिडी येथील ७ ते ८ घरांमध्ये पाणी शिरले. वृत्त लिहिस्तोवर घरातील पाणी ओसरले असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. भिडीमधील ४ कुटुंबांचे प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आलेले आहे. नागरिकांना व सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही तहसीलदारांनी दिली आहे.