डोंबिवली,
dombivli-accident : डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालय परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव चारचाकी वाहनाने भयंकर गोंधळ घातला. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून भलत्याच दिशेने आलेल्या एका निष्काळजी चालकाने रस्त्यावरील दोन चारचाकी वाहनांना आणि एका तीनचाकी रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोघे जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठा अनर्थ टळला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास वेगाने येणाऱ्या चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तिने समोरून येणाऱ्या वाहनांना एकामागोमाग एक धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचे तुकडे उडाले आणि मोठा आवाज झाला. आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डोंबिवली आगरीस्थानक ते कल्याण-शिळ मार्गाला जोडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर रोजच वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळते. या कोंडीतून लवकर बाहेर पडण्याच्या घाईत अनेक बेजबाबदार चालक सर्रास उलट्या दिशेने वाहने चालवण्याचा धोका पत्करतात. याच निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. या भागातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि उलट्या दिशेने वाहने हाकणाऱ्या टवाळ चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.