व्यक्तीला ठार करणारी टी-120 वाघिण अखेर जेरबंद

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
ब्रम्हपुरी
brahmapuri forest रानभाजी आणण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीवर हल्ला करून ठार करणार्‍या वाघिणीला (टी-120) अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले. ही कार्यवाही बुधवारी ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांगतर्गत येणार्‍या आवळगाव परिक्षेत्रातील हळदा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 222 मध्ये करण्यात आली.
 

tigress t-120 captured after fatal attack on man in brahmapuri forest 
बल्लारपूर येथील अनिल भास्कर दिवटे (32) हे 9 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कुरण गट क्रमांक 21 मध्ये रानभाजी आणण्यासाठी गेले होते. यावेळी टी-120 वाघीणीने त्यांच्यावर अचानक हल्ला करून ठार केले. या घटनेनंतर ही वाघीण शेतशिवारात व गावाशेजारी फिरत असल्यामुळे गावामध्ये व शेतीवर जाणार्‍या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वीही या वाघिणीने पाळीव प्राण्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये वनविभागाप्रती रोष निर्माण झाला होता. त्यामुळे यापुढे मानव-वन्यजीव संघर्षाच्या अनुचित घटना घडू नये याकरिता या वाघिणीला जेरबंद करणे आवश्यक झाले होते. त्यानुसारे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी वाघिणीला बेशुध्द करण्यासाठी डॉर्ट तयार करून दिला. त्यानंतर बुधवारी आवळगाव उपक्षेत्रातील हळदा नियतक्षेत्राच्या कक्ष क्रमांक 222 मध्य शुटर अजय मराठे यांनी टी-120 वाघिणीला डॉर्ट मारून बेशुध्द केल्यानंतर पिंजर्‍यात जेरबंद करण्यात आले.
ही कारवाई ब्रम्हपुरी वनविभागाचे  brahmapuri forest  उप वनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक अरविंद जे., वनपरिक्षेत्र अधिकारी सोनडवले, वन्यजीव तज्ज्ञ राकेश अहुजा यांचे सह क्षेत्रसहायक, वनरक्षक व क्षेत्रीय कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे, विकास ताजने, योगेश लाकडे, प्रफुल वाटगुरे, गुरुनानक ढोरे, दिपेश टेभुर्ने, वसीम शेख, श्री, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.