वर्धा,
wardha-yellow-alert : गेल्या दोन दिवसांपासुन आकाश दाटून येत होते. रिमझिम पाऊसही पडत होता. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि सध्या पिकांना आवश्यक असल्याने पावसाला जोर चढला पाहिजे असे प्रत्येकालाच वाटत होते. सकाळी रिमझिम सुरू झालेल्या पावसाने दुपारी ३ नंतर चांगलाच वेग पकडला. शहरातील रामनगर परिसरासह अन्य भाग जलमय झाले होते. जिल्ह्यातील आठही तालुक्यात आज समाधानकारक पाऊस झाला.

विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा आपला जोर धरला आहे. हवामान विभागाच्या नागपूर येथील वेधशाळेने ३० जुलैला वर्धा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. हवामान विभागाचे हे भाकीत खरे ठरत जिल्ह्यात सर्वदूर उशीरापर्यंत पाऊस बरसत होता. धो-धो आल्याने जनजीवनही प्रभावीत झाले. स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानाला तर अक्षरश: तलावाचे स्वरूप आले होते. शहरात मोठमोठ्या सभांसाठी प्रसिद्ध असलेल्या सर्कस ग्राउंडवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या भागातील पाणी उताराने वाहू लागल्याने श्रीनिवास कॉलनी परिसरात रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अनेकान्त स्वाध्याय मंदिर ते रामनगर स्पोर्टींग क्लबच्या मैदानापर्यंत रस्त्याचा तलाव झाला होता. याशिवाय बढे चौक, निर्मल बेकरी रस्ता, ठाकरे मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणीच पाणी झाले होते. शाळा सुटण्याच्या वेळेपर्यंत मुसळधार सुरू असल्याने विद्याथ्र्यांची तारांबळ उडाली.
पावसामुळे पूरपरिस्थिती वा नुकसान झाल्याचे वृत्तलिस्तिोवर वृत्त नाही. मात्र, आजचा पाऊस खरीप पिकांसाठी फायद्याचा झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले. यंदाच्या पावसाळ्यातील आजचा धो-धो पाऊस पहिलाच मुसळधार ठरला आहे. जलाशयांतील पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली नसल्याने दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
घरात शिरले पावसाचे पाणी
शहर व परिसरात धो-धो पाऊस झाला. काहीवेळ धो-धो तर काही वेळ रिमझीम असा पावसाचा जोर सायंकाळी उशीरापर्यंत कायम होता. शहरातील काही भागात नाल्या तुंबलेल्या असल्याने पावसाचे पाणी काही नागरिकांच्या घरात शिरले.
मोठ्या व मध्यम जलाशयांतील पाणी पातळीची स्थिती
बोर प्रकल्प : ६१.८१ टक्के
निम्न वर्धा : ६६.०४ टक्के
धाम प्रकल्प : ५३.१४ टक्के
पोथरा प्रकल्प : २५.६० टक्के
पंचधारा प्रकल्प : २६.५१ टक्के
डोंगरगाव प्रकल्प : ३६.९१ टक्के
मदन प्रकल्प : ३०.४४ टक्के
लाल नाला : ३२.९० टक्के
वर्धा कार नदी प्रकल्प : ६१.३९ टक्के
सुकळी लघु प्रकल्प : १६.१६ टक्के