मुंबई,
Women ineligible for Ladki Bahin scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील १.६६ कोटी महिला योजनेसाठी पात्र ठरल्या असून, ६६ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. महिला व बालविकास विभागाने पात्र महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा, यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली होती. त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

राज्य सरकारने २८ जून २०२४ रोजी शासन निर्णय काढून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६५ वर्षे असणे आणि संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे ही प्रमुख अट निश्चित करण्यात आली होती. याशिवाय इतर पात्रता निकषांचाही समावेश करण्यात आला आहे.महिला व बालविकास विभागाकडे या योजनेसाठी एकूण २ कोटी ६३ लाख महिलांनी नोंदणी केली होती. सुरुवातीला पहिला हप्ता वितरित करताना २.४७ कोटी महिलांना लाभ देण्यात आला होता. मात्र, ई-केवायसीनंतरची पडताळणी, चारचाकी वाहनधारक तसेच शासकीय सेवेत असलेल्या महिलांची नावे अपात्र ठरल्याने लाभार्थ्यांची संख्या घटून १.६६ कोटींवर आली आहे.
दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी अमरावती येथे बोलताना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगितले होते. तसेच ई-केवायसीसाठी सरकारने सहा महिन्यांची मुदत दिली असून, ज्या महिलांनी केवायसी केली आहे पण त्यात त्रुटी राहिल्या आहेत, त्यांनाही आवश्यक दुरुस्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.