गुरुपौर्णिमेला ज्ञानाची दुहेरी पर्वणी

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
नागपूर,
guru purnima गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत लेखिका डॉ. इंद्रायणी केदार जोशी-श्रीगिरीवार लिखित 'सिद्धस्तोत्रमणि – चैतन्यदायी आणि व्याधिनाशक स्तोत्रसंग्रह' तसेच 'Naad Sudha – The Eternal Elixir of Music Therapy' या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शंकरनगर चौक येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. इंद्रायणी जोशी-श्रीगिरीवार यांनी दोन्ही पुस्तकांच्या निर्मितीमागील प्रेरणा, संशोधनाचा प्रवास आणि समाजोपयोगी उद्दिष्टांविषयी मनोगत व्यक्त केले.
 
guru purnima
 
या सोहळ्याला पद्मश्री डॉ. विलास डांगरे, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल नारायण वैद्य, बसोली समूहाचे संस्थापक प्रा. चंद्रकांत चन्ने, डॉ. दिपश्री पाटील, योगतज्ज्ञ धनंजय सूर्यवंशी आणि ह.भ.प. श्रीराम महाराज जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
 
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने डॉ. इंद्रायणी जोशी आणि केदार जोशी यांनी आपल्या दोन्ही आई-वडिलांचा तसेच वैद्यकीय आणि कला क्षेत्रातील गुरूजनांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. या कृतज्ञता सोहळ्यामुळे सभागृहात भावनिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. शंखनाद आणि वेदोक्त मंत्रोच्चारात मान्यवरांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी वक्त्यांनी अध्यात्म, संगीत, योग, संशोधन, शिक्षण आणि समाजसेवा या विविध क्षेत्रांचा समन्वय या पुस्तकांमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आल्याचे सांगत डॉ. इंद्रायणी जोशी-श्रीगिरीवार यांच्या संशोधनपर कार्याचे कौतुक केले.
 
'सिद्धस्तोत्रमणि' या पुस्तकात विविध पुराणांतील प्रभावी स्तोत्रे, त्यांची फलश्रुती आणि शरीर-मनावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचे विवेचन करण्यात आले आहे. तर 'Naad Sudha – The Eternal Elixir of Music Therapy' या पुस्तकात भारतीय संगीतशास्त्र, आधुनिक वैज्ञानिक संशोधन आणि संगीत उपचार (Music Therapy) यांचा अभ्यासपूर्ण वेध घेण्यात आला आहे. संशोधक, विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक, संगीतप्रेमी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी ही दोन्ही पुस्तके उपयुक्त ठरतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
 
कार्यक्रमादरम्यान वरदा साठे यांनी सादर केलेल्या भरतनाट्यम सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. साहित्य, संगीत, योग, वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, संशोधक, विद्यार्थी व पुस्तकप्रेमी या सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमानंतर दोन्ही पुस्तकांच्या विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार जोशी यांनी केले. सूत्रसंचालन सौ. प्राची मुळे यांनी केले, तर सौ. आसावरी जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञान, संस्कृती, अध्यात्म आणि संगीताचा संगम घडवून आणणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.