अकोला
Akola Heavy Rain Update गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासात ७४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून मुर्तीजापुर वगळता, अकोट, तेल्हारा, बाळापुर, बार्शीटाकळी, पातुर व अकोला तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर नदी नाल्यांना पूर आल्याने काही मार्गावरील वाहतूक देखील प्रभावित झाली आहे.
जिल्ह्यात यंदा मान्सूनचा पाऊस बरसला नाही, त्यामुळे वेळेत पेरणी देखील झाली नाही,अशातच कमी पावसात शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने लाखो रुपये खर्च केलेली पेरणी उलटते ती काय?अशी धाकधूक शेतकऱ्यांमध्ये वाढली होती मात्र नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने २८ ते ३१ जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा जिल्ह्यात दिला होता. त्यानुसार २९, जुलै च्या रात्रीपासून जिल्हाभरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने नदी नाल्यांना पूर आला असून काही मार्गावरील वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. आज शुक्रवारी देखील हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
तेल्हारा-निंबा-शेगाव मार्ग बंद
अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा निंबा शेगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.या मार्गावरील विद्रुपा व आस नदीला पूर आल्याने मनात्री व पंचगव्हाण, तळेगाव बाभूळगांव येथील पुलावरून पाणी गेले आहे.याशिवाय पारळा येथील छोट्या पुलावरून पाणी असल्याने चोहट्टा मार्गे अकोला जाणारी वाहतूक देखील प्रभावित झाली आहे.
जल प्रकल्पात वाढ
काटेपूर्णा -२०.८५ %
वान- ५३.०२%
मोर्णा-५६.८२%
निर्गुणा -३७.३०%
दगडपारवा-४५.३३
२४ तासांत तालुकानिहाय पाऊस
अकोट ७२.३
तेल्हारा ७२.२
बाळापुर ८३.४
पातुर १०२.३
अकोला ६७.८
बार्शीटाकळी ७८.३
मूर्तीजापुर. ६१.३
मोर्णाच्या पातळीत वाढ; राजेश्वर सेतूवरील मार्ग वाहतुकीसाठी बंद
अकोला शहरातून जाणाऱ्या मोर्णा नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी राजेश्वर सेतूला पाणी टाकले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.याशिवाय जिल्ह्यातील आस, विद्रूपा, गौतमा, मन नदीला देखील पूर आला असून पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.