नवी दिल्ली,
Ankit Sharma murder case २०२० मधील दिल्ली दंगलीदरम्यान आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी करकरडूमा न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने माजी नगरसेवक ताहिर हुसेन याच्यासह नाझिम, कासिम, अनस आणि जावेद या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यापूर्वी १३ जुलै २०२६ रोजी न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवले होते.शिक्षा सुनावताना न्यायालयाने या हत्येचे वर्णन अत्यंत क्रूर आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा असे केले. अंकित शर्मा यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह चांद बाग परिसरापर्यंत ओढत नेऊन गटारात फेकण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले. या घटनेने समाज हादरला असून, अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे समाजाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचेही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तसेच अंकित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. पोलिसांनी हा गुन्हा "अत्यंत दुर्मिळ स्वरूपाचा" असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला होता.तपासादरम्यान सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, अंकित शर्मा यांच्या शरीरावर एकूण ५१ जखमा आढळल्या होत्या. त्यापैकी ७ जखमा प्राणघातक होत्या, तर १६ जखमा धारदार शस्त्रांनी करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले. तसेच मृत्यूनंतरही त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला.
दुसरीकडे, ताहिर हुसेन यांच्या वकिलांनी फाशीच्या शिक्षेच्या मागणीला विरोध केला. ताहिर हुसेन यांनी स्वतः पोलिसांना फोन करून बोलावले होते, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. केवळ जखमांची संख्या किंवा स्वरूप याच्या आधारे फाशीची शिक्षा देता येत नाही, असेही त्यांनी न्यायालयात मांडले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावत प्रकरणाचा निकाल दिला.