इस्लामाबाद,
Arshad Nadeem's emotional post पाकिस्तानचा स्टार भालाफेकपटू अर्शद नदीमने २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर चाहत्यांना भावनिक साद घातली आहे. अंतिम सामन्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने पाकिस्तानसाठी पदक जिंकण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.अर्शद नदीमने व्हिडिओमध्ये सांगितले की, ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. "अल्लाहच्या कृपेने आणि तुमच्या पाठिंब्यामुळे मी अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून पाकिस्तानसाठी पदक जिंकता यावे, यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा," असे तो म्हणाला.
त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही सर्व चाहत्यांचे प्रेम, पाठिंबा आणि शुभेच्छांसाठी आभार मानत अंतिम सामन्यापूर्वी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, भारताकडून नीरज चोप्रासह रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तानसह एकूण १२ खेळाडूंमध्ये सुवर्णपदकासाठी चुरशीची लढत रंगणार आहे.
भालाफेकीची अंतिम स्पर्धा १ ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२:४५ वाजता खेळवली जाणार आहे. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंमध्ये नीरज चोप्रा (भारत – ७९.६१ मीटर), रोहित यादव (भारत – ७८.३७ मीटर), यशवीर सिंग (भारत – ७८.३६ मीटर), रुमेश पाथिरागे (श्रीलंका – ८२.८४ मीटर), अँडरसन पीटर्स (ग्रेनेडा – ८१.२९ मीटर), डाऊ स्मित (दक्षिण आफ्रिका – ८०.६४ मीटर), बेन ईस्ट (इंग्लंड – ८०.३८ मीटर), कॅमेरॉन मॅकइंटायर (ऑस्ट्रेलिया – ७८.९१ मीटर), अर्शद नदीम (पाकिस्तान – ७८.६३ मीटर), कीशॉन स्ट्रॅचन (बहामास – ७८.६० मीटर), कीशॉन वॉलकॉट (त्रिनिदाद – ७८.२६ मीटर) आणि चिनेचेरेम न्नामदी (नायजेरिया – ७५.२७ मीटर) यांचा समावेश आहे.