वरोडा,
khushal-mandavkar : वरोडा शहरालगतच्या बोर्ड येथील रहिवासी तथा सीमा रस्ते संघटना डीआरओ अंतर्गत जनरल रिझर्व इंजिनिअर फोर्समध्ये कार्यरत सुभेदार खुशाल देवराव मांडवकर यांचे सिक्कीममध्ये रुग्णालयात उपचार घेताना 28 जुलै रोजी निधन झाले होते. त्यांच्यावर शुक्रवार, 31 जुलै रोजी आनंदवनातील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खुशाल मांडवकर हे सिक्कीममध्ये बॉर्डर आर्मी दलात कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सिक्कीममधील चंदथाग जिल्ह्यातील मगन येथील सैन्याच्या 327 फिल्ड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना 28 जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. खुशाल मांडवकर यांनी 16 वर्ष सैन्यात सेवा केली. गुरुवारी रात्री त्यांचे पार्थिव बोर्डा येथील निवासस्थानी आणण्यात आले. शुक्रवारी आनंदवन स्मशानभूमीत चंद्रपूर पोलिस दलाच्या जवानांनी तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली.
शासनाच्या वतीने तहसीलदार योगेश कौरटकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांचा मुलगा अंशुल यांनी मुखाग्नी दिला. यावेळी आ. करण देवतळे, शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे, पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, बोर्डा ग्रामपंचायतचे सरपंच राहुल ठेंगणे, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच शोकाकुल ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.