हिंदी विद्यापीठाच्या ७ विद्यार्थ्यांना चीन सरकारची शिष्यवृत्ती

दरमहा मिळणार ४२ हजार रुपये चीनमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये करणार अध्ययन

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
Chinese Government Scholarship for Hindi University महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या भाषा विद्यापीठांतर्गत इंग्रजी व परकीय भाषा अध्ययन विभागाच्या चिनी भाषा पदवी अभ्यासक्रम (२०२३-२७) मधील सात विद्यार्थ्यांची चीन सरकारच्या प्रतिष्ठित चायना स्कॉलरशिप कौन्सिल (सीएससी)च्या पूर्ण वित्तपोषित शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. निवड झालेले विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये चीनमधील विविध प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये नॉन-डिग्री जनरल स्कॉलर प्रोग्राम अंतर्गत अध्ययन करणार आहेत. या शिष्यवृत्तीअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा ३००० युआन (सुमारे ४२ हजार रुपये) आर्थिक सहाय्य मिळणार आहे. विद्यार्थ्यांची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील चिनी भाषा प्रावीण्य परीक्षा एचएसके मधील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी ऑगस्ट महिन्यात चीनला रवाना होणार असून त्यांचे शैक्षणिक सत्र १ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होईल.
 
 

त्या  
 
 
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आशुतोष, ब्रजेश कुमार आणि सुदर्शन कुमार यांची बीजिंग लँग्वेज अ‍ॅण्ड कल्चर युनिव्हर्सिटीमध्ये, सनोज कुमार यांची सेंट्रल चायना नॉर्मल युनिव्हर्सिटीमध्ये, पूजा सैनी यांची त्सिंगहुआ युनिव्हर्सिटी, अपूर्वा अभय तायडे यांची वुहान युनिव्हर्सिटी तसेच रितेश राज यांची शान्शी युनिव्हर्सिटीमध्ये अध्ययनासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी विभागाचे प्रभारी डॉ. अनिर्बाण घोष आणि संशोधक इंद्रजीत मिश्र यांच्यासह विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे यश विद्यापीठाच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आणि परकीय भाषा अध्ययनातील उत्कृष्टतेचे द्योतक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेत असताना भारतीय संस्कृती, हिंदी भाषा आणि विद्यापीठाच्या गौरवाचे उत्तम प्रतिनिधित्व करण्याचे आवाहन केले. उल्लेखनीय म्हणजे, गतवर्षीही याच विभागातील पाच विद्यार्थ्यांची याच शिष्यवृत्तीअंतर्गत चीनमधील चार विद्यापीठांमध्ये निवड झाली होती. सलग दुसर्‍या वर्षी मिळालेल्या या यशामुळे विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक ओळख अधिक बळकट झाली आहे.