देवळी,
road-and-drain-issues : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तिवारी ले-आऊट, केदार ले-आऊट परिसर जलमय झाला. या परिसरात रस्ता, नाल्या व सांडपाण्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज ३१ रोजी नप कार्यालयात धडक देत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकारी अथवा संबंधित अधिकारी कार्यालयात नसल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला. यानंतर नागरिकांनी नप कार्यालयातच ठिय्या दिला.
तिवारी ले-आऊट, केदार ले आऊटमध्ये रस्ता व सांडपाणी निचर्याची समस्या कायम असून मुख्य नाली नसल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. रस्ता नसल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच नगराध्यक्ष किरण ठाकरे नप कार्यालयात दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत निवेदन स्वीकारले. संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून रस्ता व नाल्यांच्या समस्येवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.