अमरावती,
crop-damage-in-amravati : मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्यालाच तडाखा दिला आहे. अमरावती शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. यात ३८ हजार १८३ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान व १०९२ घरांची पडझड झाली असून सर्वाधिक २०१.८ मिमी पाऊस व नुकसान नांदगाव खंडेश्वर तालुक्यातच झाले आहे. १२८३ पशुधनाचा मृत्यू झाला. ४० महसूली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यातील २१ मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. एक व्यक्ती पुरात वाहून गेली आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यात १६५ मिमी पाऊस व २३४ हेक्टरवरील पिकांचे तर धामणगाव रेल्वे तालुक्यात १४८ मिमी व २१३८ हेक्टर पिकांचे, भातकुली तालुक्यात ६६ मिमी पाऊस तर ४५२१ हेक्टरवरील पिकांचे, मोर्शी तालुक्यात १९५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन, कपाशी, तर याच पिकांना फटका बसला आहे. अमरावती तालुक्यात ९७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावती शहरातील अकोली, नवाथे नगर व राजापेठ येथील रेल्वे भुयारी मार्गात सर्वत्र पाणी साचलेले होते. शहरातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले होते. जिल्ह्यात सरासरी ७६ मिमी पाऊस झाला आहे. मुसळधार पाऊस कोसळल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली गावात अनेक ठिकाणी पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या मुसळधार पावसामुळे जळू नदीला पूर आला. पुराचे पाणी शेतांमध्ये घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याशिवाय मंगरूळ चव्हाळा विभागासह हरणी गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हरणी गावाचा दुपारी ४ वाजल्यापासून रात्री सुमारे ११ वाजेपर्यंत बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला होता. गावाकडे जाणाऱ्या दोन ते तीन मार्गांवरील नदीच्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी रस्तेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. बेंबळा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या सर्व गावांचे व शेतीचे माठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड परिसरातील खारवगळ नदीला मोठा पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत झालेल्या झपाट्याने वाढीमुळे नदीकाठावरील मोठ्या प्रमाणातील शेती पाण्याखाली गेली असून सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला. घुईखेड व परिसरातील अनेक शेतांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने उभे असलेले सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.