आर्वी,
dahegaon-primary-health-centre : दहेगाव (मुस्तफा) हे सात गावांचे मध्यवर्ती गाव असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे परिसरातील सात गावांतील सुमारे ९ हजार नागरिकांना आरोग्य सेवा मिळणे अवघड होते आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण तसेच आमदार सुमित वानखेडे यांना निवेदन दिले. दहेगाव (मुस्तफा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
दहेगाव (मुस्तफा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास सातही गावांतील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध होईल. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दूरच्या रुग्णालयात न्यावे लागत असल्याने वेळ वाया जात असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. शासनाने तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे; अन्यथा धरणे, उपोषण, मोर्चा आणि जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.
निवेदन देतेवेळी गोर सेना नागपूर विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड, मुकेश दुपारे, विनोद राठोड, राजू जाधव, सचिन जीवतोडे, आनंद थोरात, अंकित राऊत, अवधूत रामगडे, अफसर शेख, प्रणय नागोसे, दिनेश राठोड, राजू जाधव, अमित धोबे, गुरुदेव चापले, भारत एकोणकर, करण गोंडे, आदींची उपस्थिती होती.