नवी दिल्ली,
Everything in one app for rail passengers रेल्वे प्रवाशांसाठी आता एकाच ॲपमध्ये अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तिकीट बुकिंगपासून ते ट्रेनमध्ये जेवण मागवण्यापर्यंतची कामे आता RailOne ॲपच्या माध्यमातून करता येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळे ॲप डाउनलोड करण्याची गरज राहणार नाही आणि प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. RailOne हे रेल्वे प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेले एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म आहे. या ॲपच्या माध्यमातून आरक्षित आणि सामान्य रेल्वे तिकीट बुक करता येते. तसेच प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. प्रवाशांना ट्रेनमधील प्रवासाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
या ॲपमध्ये रेल मदत सुविधेचा समावेश करण्यात आला असून, प्रवाशांना प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी किंवा तक्रारी थेट नोंदवता येणार आहेत. याशिवाय ट्रेनचा पीएनआर स्टेटस तपासणे, ट्रेनचे लाईव्ह लोकेशन पाहणे आणि मासिक पास काढण्याची सुविधाही RailOne ॲपवर उपलब्ध आहे.रेल्वे प्रवाशांना आता ट्रेनमध्ये ऑनलाइन जेवण मागवण्याची सुविधाही या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे तिकीट, प्रवासाची माहिती आणि इतर गरजेच्या सेवांसाठी अनेक ॲप्स वापरण्याऐवजी एकाच ॲपवर सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
असे करा RailOne ॲप डाउनलोड
- RailOne ॲप वापरण्यासाठी प्रवाशांना गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करावे लागेल. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल नंबरच्या माध्यमातून लॉग इन करून या सर्व सुविधांचा वापर करता येणार आहे.
- रेल्वे प्रवाशांसाठी हे ॲप वेळ वाचवणारे ठरणार असून, तिकीट बुकिंगपासून ते प्रवासातील तक्रारीपर्यंत अनेक सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ आणि आरामदायी होण्याची शक्यता आहे.