गडचिरोली,
flood-gadchiroli-police : अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला असतानाच लाहेरी येथील एका गंभीर रुग्णाला गडचिरोली पोलिसांनी पवन हंस हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तातडीने गडचिरोली येथे आणून उपचारासाठी दाखल करत वेळेवर मदत केली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पामुलगौतम व पर्लकोटा नद्यांना पूर आला असून भामरागड तालुक्यातील अनेक दुर्गम गावांचा संपर्क खंडित झाला आहे. अशा परिस्थितीत लाहेरी येथील रहिवासी शामसुंदर नरोटी (35) यांची विषबाधा अथवा सर्पदंशामुळे प्रकृती गंभीर झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन व गडचिरोली पोलिस दलाने तातडीने हालचाल करत पवन हंस हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केले. त्यानंतर शामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी भामरागड परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ रुग्णालय अथवा आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधून वेळेत उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.
ही संपूर्ण कार्यवाही जिल्हा प्रशासन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय भामरागड, भामरागड पोलिस ठाणे, महसूल विभाग तसेच पवन हंसचे पायलट अरविंद सैनी व राजीव शर्मा यांच्या समन्वयाने यशस्वीपणे पार पडली.