मुंबई
Sukanya Samruddhi Scheme मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत एक हजार मुलींना धनादेशांचे वितरण करण्यात आले. या योजनेत सहभागी झालेल्या एक हजार मुलींच्या बँक खात्यांमध्ये आता दरवर्षी २० हजार रुपये जमा केले जाणार असून, ही रक्कम पुढील सलग दहा वर्षे सरकारच्या वतीने जमा केली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत एक हजार मुलींची बँक खाती सुरू करण्यात आली असून, आजचा कार्यक्रम हा नव्या युगाची सुरुवात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा विचार देशासमोर मांडला. त्याआधीच्या काळात स्त्रीभ्रूण हत्येच्या घटना घडत होत्या आणि मुलगी ही ओझे असल्याची मानसिकता समाजात निर्माण झाली होती. त्या विचारसरणीचे दुष्परिणाम आजही देशाला भोगावे लागत आहेत, असे ते म्हणाले.
विकसित भारताचे स्वप्न मांडताना पंतप्रधान मोदी यांनी ज्या देशांनी प्रगती केली, त्या प्रत्येक देशाच्या विकासामध्ये महिलांचा ५० टक्के वाटा असल्याचे सांगितले होते, असे नमूद करत फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय देशाची प्रगती शक्य नसल्याचे अधोरेखित केले. तसेच, महिलांना असमानतेची वागणूक दिल्यामुळेच देशाला हजार वर्षे पारतंत्र्य सहन करावे लागले, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. मुलींची बचत खाती उघडून त्यामध्ये सरकारकडून रक्कम जमा करण्यात येत असून, त्यावर साडेआठ टक्के व्याज मिळणार आहे. या ठेवींवर कोणताही कर आकारला जाणार नाही आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ही संपूर्ण रक्कम तिच्या ताब्यात दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाश्चिमात्य आणि Sukanya Samruddhi Scheme भारतीय विचारसरणीतील फरक स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, “जिसमे ताकद होगी वो बचेगा,” हा पाश्चिमात्य विचार असू शकतो; मात्र भारताची संस्कृती त्यापेक्षा वेगळी आहे. भारतात जो जन्माला आला आहे, त्याला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आणि विचार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.