संततधार पावसामुळे अनेक मार्ग बंद

*इरई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
चंद्रपूर,
rain-chandrpur : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे वर्धा नदीला पूर आला असून, अनेक नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे चंद्रपूर-भोयेगाव-गडचांदूर मार्गासह मूल, गोंडपिपरी, वरोडा, भद्रावती, राजुरा कोरपना, बल्लारपूर तालुक्यातील काही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. इरई धरणाच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून, धरणाचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या वतीने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
 
JLK
 
 
 
अधून मधून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लहान-मोठे नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने ग्रामीण भागातील काही मार्गांवर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मूल तालुक्यातील केळझर, चिरोली, गोंडपिपरी तालुक्यातील सरांडी ते वेजगाव रस्ता बंद झाला आहे. वरोडा तालुक्यातील सोईट येथील वर्धा नदीच्या पात्रात वाढ झाली असून, पुलाच्या 4 फूट खालून पाणी वाहत आहे. भद्रावती तालुक्यात पळसगावला जाणार्‍या कुचना, माजरी, विसलोन मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पळसगावचा मार्ग बंद झाला आहे.
 
 
राजुरा तालुक्यात सिंधी नाला पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. नोकरी बु., गोवारीगुडा येथील नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. तर चिंचोली अंतरगाव रस्ता बंद झाला आहे. कोरपना तालुक्यात गडचांदूर कंपनीमधून जिवतीकडे जाणारा रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. वर्धा नदीवरील पूल बुडाल्याने भोयगाव-धानोरा मार्ग बंद आहे.
 
 
धानोरा-भोयेगाव-गडचांदूर मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. इरई-भारोसा पुल बुडाल्याने हा मार्गसुध्दा बंद आहे. तर बल्लारपूर तालुक्यातील काटवली ते बाम्हणी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
 
 
इरई धरणातील पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. 31 जुलै रोजी सकाळी 9 वाजता 205.950 मीटर इतकी पातळी गाठल्याने इरई धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इरई नदीच्या काठावर राहणार्‍या सर्व नागरिकांना स्वतः नदीच्या पात्रापासून दूर राहावे तसेच आपली जनावरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहे. तसेच, इरई धरणाच्या क्षेत्रातील संभव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाय व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धरणाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात येतील, असेही कळविण्यात आले आहे.
 
24 तासात जिल्ह्यात 47.9 मिमी पाऊस
 
 
मागील 24 तासात 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात 47.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 89.9 मिमी पाऊस वरोडा तालुक्यात पडला आहे. तर भद्रावती 75.7 मिमी, बल्लारपूर 69 मिमी, सिंदेवाही 55 मिमी, गोंडपिपरी 51.1 मिमी, राजुरा 44.7 मिमी, सावली 43.6 मिमी, चंद्रपूर 42.5 मिमी, मूल 42.3 मिमी, कोरपना 37.2 मिमी, जिवती 36.7 मिमी, नागभिड 30.9 मिमी, पोंभुर्णा 30.9 मिमी, चिमूर 30.2 मिमी तसेच ब्रम्हपुरी तालुकत 26.8 मिमी पाऊस झाला आहे.
 
इरई धरणात 62.61 टक्के जलसाठा
 
 
चंद्रपूरची जलवाहिनी असलेल्या इरई प्रकल्पात 31 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 62.61 टक्के (95.415 दलघमी) जलसाठा उपलब्ध होता. तर डोंगरगाव 74.99 टक्के (9.33 दलघमी), चारगाव 72.21 टक्के (12.522 दलघमी), पकडिगुड्डम 69.46 टक्के (8.194 दलघमी), चंदई 46.23 (4.9418 दलघमी), अंमलनाला 46.09 टक्के (10.25), असोलामेंढा 63.12 टक्के (33.03 दलघमी), गोसेखुर्द 58.05 टक्के (433.053 दलघमी), नलेश्वर 40.74 टक्के (4.1682 दलघमी), लभानसराड 35.14 टक्के (2.538 दलघमी) तसेच घोडाझरी धरणात 26.44 टक्के (10.923 दलघमी) जलसाठा आहे.