दिवसभर पावसाच्या सरीवर सरी

- "नभ उतरू आलं" -५२.६ मिलिमीटर पावसाची नोंद

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
नागपूर, 
nagpur-rain : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर शुक्रवारी दिवसभरात दोन-तीन वेळा पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास एकीकडे पाऊस सुरू असताना दुसरीकडे सूर्याचे दर्शनही झाले. तीन दिवसांपूर्वी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने दाणादाण उडविल्यानंतर गुरुवारी व शुक्रवारी सरीवर सरी कोसळल्या.
 
 

JNK 
 
 
 
सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना गैरसोईंचा सामना करावा लागला. नागपूरसह विदर्भातील आठ जिल्ह्यांना 'फ्लॅश फ्लड रिस्क' अर्थात अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला गेला होता. नागपूर जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार सरी बरसल्यानंतर काही काळ चक्क ऊन निघाले होते. सकाळपासूनच पावसाळी वातावरण असल्याने नागरिकांनी रेनकोट व छत्र्या घेऊन घराबाहेर पडणे पसंत केले. वाहनचालकांना रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. अनेक भागांत दिवसभर पावसाने हजेरी लावली. अधूनमधून विश्रांती घेतल्याने नागरिकांना पावसाचा आनंद घेता आला. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात थोडाफार गारवा जाणवत आहे. पावसामुळे कमाल तापमान अंशतः घसरले असून नागपुरात कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सायंकाळी साडेपाचपर्यंत ५२.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.