अनिल कांबळे
नागपूर,
News regarding Kapilnagar Police वयाचे १८ वर्षे पूर्ण होताच मुलीच्या घरात लग्नाबाबत चर्चा सुरु झाली. मुलीला पुढील शिक्षण घ्यायचे असल्याने लग्नाची भीती वाटत होती. तिने ही समस्या एका मित्राला सांगितली. मैत्रिणीच्या शिक्षणासाठी आटापीटा करीत त्याने तिला घर सोडून शिक्षणासाठी बाहेर राज्यात जाण्याची योजना आखली. शैक्षणिक कागदपत्र घेऊन दोघांनीही घरातून पळ काढला. दोघांचेही कुटुंब बुचकळ्यात पडले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पंजाबमध्ये संपर्क साधून तरुण-तरुणीला ताब्यात घेतले. दोघांचे समूपदेशन केले. मुलीच्या पालकांनी लग्नाचा विचार सोडून मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले. ही अजब मैत्रीची गजब कहाणी कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
कळमन्यात राहणारी १८ वर्षीय तरुणी रजनी (काल्पनिक नाव) ही बारावी उत्तीर्ण झाली असून तिला पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती. तिचे आईवडील हातमजुरी करणारे असून त्यांनी मुलीचे लग्न उरकून टाकून डोक्यावरील भार कमी करण्याबाबत विचार केला. त्यामुळे घरात रजनीच्या लग्नाची चर्चा सुरु होती. मात्र, रजनीला पुढील शिक्षण घ्यायचे होते. तिने आईशी चर्चा केली परंतु आईने लग्नाला प्राधान्य देण्याचे ठरविले. त्यामुळे रजनी नैराश्यात गेली. तिच्या वागणुकीत बदल झाला. तिने ही समस्या आपला जीवलग मित्र पंकजसिंग याला सांगितली. पंकजसिंग हा मूळचा पंजाबचा असून तो वडिल आणि आजीसह पारडीत राहतो. वडिलांचा गॅरेजचा व्यवसाय असून तोसुद्धा वडिलांना मॅकेनिक म्हणून मदत करतो. रजनी आणि पंकजसिंग यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. पंकजसिंगचे नातेवाईक पंजाबमध्ये असल्यामुळे त्याने रजनीला तेथे पुढील शिक्षण पूर्ण करण्याची योजना सांगितली. रजनीसुद्धा होकार दिला. तिने टीसी, आधारकार्ड, गुणपत्रिका, जातीप्रमाणपत्र यासह अन्य शैक्षणिक कागदपत्रे घेतली. दोघांनीही एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरातून पलायन केले.
कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी धावपळ
रजनी आणि पंकजसिंग थोडेफार पैसे घेऊन पंजाबला नातेवाईकांकडे पोहचले. त्याने मैत्रिण असल्याची ओळख करुन दिली आणि पुढील शिक्षणासाठी मदत मागितली. पंकजसिंगने पंजाबमधील अनेक महाविद्यालयात रजनीला प्रवेश मिळविण्यासाठी चकरा मारल्या. मात्र, तिला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पंकजसिंग हतबल झाला. रजनीचे शिक्षण थांबणार याची त्याला काळजी वाटली.
कुटुंबियांची पोलिसांकडे धाव
दोघांच्याही कुटुंबियांनी कपिलनगरचे ठाणेदार सतीश आडे यांची भेट घेतली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक शिवाली उलेमाले आणि हवालदार अक्षय सहारे यांना रजनी-पंकजसिंगचा शोध घेण्यास सांगितले. तांत्रिक तपास करीत दोघेही पंजाबमध्ये असल्याचे कळले. पोलिसांनी दोघांशीही संपर्क साधला. त्यांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात दोघांच्याही कुटुंबियांना बोलावले. ठाणेदार आडे यांनी रजनी-पंकज यांचे समूपदेशन केले. तसेच दोघांच्याही पालकांची समजूत घातली. रजनीच्या वडिलांनी मुलीला पुढील शिक्षण घेण्यास परवानगी दिली. दोन्ही मुले-मुली आपापल्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. मात्र, या प्रकारातून ‘अजब मैत्रीची गजब कहाणी’ समोर आली.