तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
nilona-dam-overflows : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत केले असले, तरी या पावसामुळे शहराला पिण्याचा पाणीपुरवठा करणारे निळोणा धरण 100 टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे यवतमाळकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता तूर्तास मिटली आहे.
या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकèयांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकèयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे यवतमाळ शहराची ‘वॉटर बँक’ म्हणून ओळख असलेले निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे आगामी काळात शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
तथापि, हवामान विभागाने पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.