मुंबई,
Omar and Payal's divorce granted. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांची पत्नी पायल अब्दुल्ला यांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला वैवाहिक वाद अखेर संपुष्टात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर करत प्रकरण निकाली काढले. परस्पर संमतीने सर्व वाद मिटविल्याची माहिती न्यायालयासमोर देण्यात आल्यानंतर हा निर्णय देण्यात आला.सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ओमर आणि पायल अब्दुल्ला यांनी परस्पर चर्चेतून सर्व मतभेद मिटवले असून, भारतीय संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने घटस्फोट मंजूर करावा. न्यायालयाने या तोडग्याचे स्वागत करत याचिकेला मंजुरी दिली.
न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, २२ जुलै रोजी घटस्फोटासाठी संयुक्त याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्यावरही सहमती दर्शवली आहे. त्यानुसार न्यायालयाने प्रकरणाचा निकाल दिला.ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या याचिकेत पायल अब्दुल्ला यांच्यासोबतचे वैवाहिक नाते पूर्णपणे तुटल्याचा दावा केला होता. हे नाते पुन्हा पूर्ववत होण्याची कोणतीही शक्यता नसल्यामुळे घटस्फोट मंजूर करण्यात यावा, अशी त्यांची भूमिका होती.
ओमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांचा विवाह सप्टेंबर १९९४ मध्ये झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले असून, ते २००९ पासून वेगळे राहत आहेत. याआधी ३० ऑगस्ट २०१६ रोजी कौटुंबिक न्यायालयाने ओमर अब्दुल्ला यांची घटस्फोटाची याचिका फेटाळली होती. क्रूरता आणि परित्यागाचे आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याचे कारण देत न्यायालयाने त्यांची मागणी नाकारली होती. यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र डिसेंबर २०२३ मध्ये न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती विकास महाजन यांच्या खंडपीठानेही कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षांमध्ये परस्पर संमतीने तोडगा निघाल्यानंतर त्यांचा घटस्फोट मंजूर करण्यात आला.