नवी दिल्ली,
rahul-gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या लोकसभेतील अडचणी वाढल्या आहेत. भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी सभापती ओम बिरला यांच्याकडे त्यांच्या विरोधात विशेषाधिकारभंग आणि सभागृहाच्या अवमानाची नोटीस दाखल केली आहे. ठाकूर यांचा आरोप आहे की, लोकसभेत पेपर फूट विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर असंसदीय, अपमानजनक आणि निराधार आरोप केले. हे कृत्य संसदीय परंपरा आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे.
तीन पानी नोटीसमध्ये अनुराग ठाकूर यांनी लोकसभेच्या सभापतींना हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची विनंती केली आहे. समितीने सविस्तर चौकशी करून योग्य कारवाईची शिफारस करावी़ राहुल गांधी यांना सभागृह आणि गृहमंत्री अमित शाह यांची बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे़ तसेच अशी भाषा संसदीय कामकाजाच्या शिष्टाचारासाठी अयोग्य आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभेच्या नियम ३५२ चे उल्लंघन
नोटीसमध्ये, अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, २९ जुलैला पेपर फूट विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान, राहुल गांधी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या कथित संभाषणाचा उल्लेख केला. या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी लोकसभेच्या नियम ३५२ चे उल्लंघन केले. त्यांनी केलेले आरोप निराधार होते़ त्यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला, असेही नाेटीसमध्ये नमूद आहे.