गोंदिया,
rice-laden-truck-theft-case : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या सावरी येथील बसस्थानक परिसरात 17 जुलै रोजी पहाटे घडलेल्या ट्रक चोरी प्रकरणाचा रावणवाडी पोलिसांनी यशस्वी उलगडा करत आणखी तीन फरार आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील एका मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने अटक केली होती. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असताना 30 जुलै रोजी सकाळी रावणवाडी पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

किशन चेवनलाल गरडे (32) रा. सावरी, रणजीत खेमलाल सौलाखे (27) आणि पंकज प्रेमलाल गरडे (27) दोघेही राहणार लोधीटोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तालुक्यातील सावरी बसस्टॉप जवळ उभा असलेला ट्रक चोरी करून त्यामधील सुमारे 30 टन तांदूळ परस्पर विक्री करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली असता स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने आरोपी संजयकुमार राजकुमार दमाहे यास अटक केली होती. तपासादरम्यान या प्रकरणात आणखी तीन आरोपी किशन गरडे, रणजीत सौलाखे, पंकज गरडे यांचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले होते. मात्र, घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार होते. दरम्यान, तिघांचा रावणवाडी पोलिसांकडून शोध सुरु असताना गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी तिघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावणवाडीचे पोलिस निरीक्षक रामदास शेवते व त्यांच्या पथकाने केली.