वर्धा,
sanskar-bharati : संस्कार भारतीने वर्धा शहराला सांस्कृतिक मेजवाणी देण्याची परंपरा गेल्या ९ वर्षांपासुन सुरू केली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दहाव्या वर्षी अभंग गायनातून स्थानिकांना संधी दिल्या गेली. सोबतच स्थानिक समाजसेवकाचा सत्कारही केल्या जातो. यावर्षीही संस्कार भारतीने आपली परंपरा कायम ठेवली.
स. ब. सार्वजनिक वाचनालय व संस्कार भारती वर्धा शाखेच्या वतीने आषाढीनिमित्त अभंगाचा कार्यक्रम तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त भागवत कथाकार व सामाजिक जाणीव जपणारे व्यक्तिमत्त्व सुशीला वाघ यांचा सत्कार लोकतंत्रसेनानी हरिभाऊ वझुरकर, गौरीशंकर टिबडेवाल व सतीश बावसे यांचे हस्ते करण्यात आला.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ या शीर्षकांतर्गत या दहाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्याच अभंगाच्या गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अभंगाच्या कार्यक्रमाचे निवेदन वर्धेतील प्रसिद्ध वास्तू विशारद व संत साहित्याचा व्यासंग असलेले मकरंद पाठक यांनी केले. या कार्यक्रमचे प्रायोजकत्व हरिभाऊ वझुरकर यांनी केले होते. कार्यक्रमारला वर्धेकर प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती होती. संचालन सुजाता जोशी यांनी केले. प्रास्ताविक सतीश बावसे यांनी केले.
संस्कार भारती जिल्ह्याची नवीन वर्षाची कार्यकारिणी प्रांत पदाधिकारी मंगेश परसोडकर यांनी घोषित केली. आभार मकरंद उमाळकर यांनी मानले.
सुशीला वाघ यांनी सत्काराला उत्तर दिले. मानपत्राचे वाचन मिलिंद मशांनकर यांनी केले. गायक वादक कलाकारांनी आपली अभंगाची प्रस्तुती दर्जेदार करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. केतकी कुलकर्णी, सानिका बोभाटे, कवीनेसन, नितीन वाघ, अमित लांडगे यांनी अभंग सादर केले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरता अनिल पाखोडे, पंकज घसे, उद्धव भुसारी, प्रल्हाद मानकर, चंद्रकांत सहारे, अनिल खंगार, सायली किन्हेकर, संस्कृती कुलकर्णी, रुत्वा परसोडकर यांनी परिश्रम घेतले.