नवी दिल्ली,
indias power bank भारत दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विकसनशीलतेकडे प्रवास करतो आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना भारतीयांचा कल नेहमीच स्वदेशीकडे असतो. याच तंत्रज्ञानाच्या जोरावर अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय स्टार्टअप ‘टेकमीटूस्पेस’ने पहिल्या स्वदेशी बनावटीच्या उपग्रह बॅटरीचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक सादर केले. ही घटना भारताच्या वाढत्या खाजगी अंतराळ परिसंस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरली आहे. या भारतीय स्टार्टअप कंपनीने अवकाशातील उपग्रहांना अवकाशातच चार्ज करण्यासाठी देशातील पहिली स्वदेशी बॅटरी (पॉवर बँक) यशस्वीरित्या विकसित केली आहे.

कंपनीच्या ‘पॉवरबँक-५०’ने स्कायरूट एरोस्पेसच्या ‘विक्रम-१’मधील ‘आगमन’ मोहिमेतील एका पेलोडला यशस्वीपणे ऊर्जा पुरवली. अशा प्रकारे, अंतराळात उड्डाणाद्वारे कार्यक्षमता सिद्ध करणारी ही भारतातील पहिली उपग्रह बॅटरी ठरली आहे. ५० वॅट प्रति तास क्षमतेची बॅटरी ‘ऑर्बिटल एक्सपेरिमेंटेशन मॉड्यूल’वरील ‘कॉस्मोसर्व्ह स्पेस’च्या पेलोडसोबत जोडण्यात आली आणि पृथ्वीच्या ४५० किमी उंचीवरील निम्न कक्षेत ती यशस्वीपणे कार्यान्वित झाली. या कामगिरीमुळे भारतीय उपग्रह उत्पादकांना देशांतर्गत निर्मित ऊर्जा प्रणाली उपलब्ध झाली. यामुळे महागड्या आयात केलेल्या घटकांवरील अवलंबन कमी झाले.
‘पॉवरबँक-५०’ने यशस्वीपणे अंतराळात अंतराळात कार्य केले. तसेच, या बॅटरीने भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले कक्षीय प्रक्षेपण यान, विक्रम-१ वर आपला पहिला ‘मिशन पॅच’ मिळवला आहे, अशी घोषणा या यशस्वी मोहिमेनंतर टेकमीटूस्पेसने केली. आतापर्यंत, भारतीय उपग्रह निर्माते मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या, अवकाश-मान्यता मिळालेल्या बॅटरी प्रणालींवर अवलंबून होते. ज्यांची किंमत अनेकदा जास्त आणि खरेदीसाठी बराच वेळ लागत होता. बंगळूर-स्थित स्टार्टअपच्या म्हणण्यानुसार, त्यांची बॅटरी एक लाख चार हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे. ही आंतरराष्ट्रीय पर्यायांपेक्षा लक्षणीयरीत्या स्वस्त आहे.
साधारणपणे एका स्मार्टफोनइतकेच म्हणजे केवळ ३८० ग्रॅम वजन आणि पुस्तकाएवढा आकार (पेपरबॅक) असलेल्या, ‘पॉवरबँक-५०’ मध्ये ५० वॉट प्रति तासापेक्षा जास्त ऊर्जा साठवली जाते. यात लहान उपग्रहांसाठी उपलब्ध असलेल्या काही सर्वाधिक ऊर्जा-घनतेच्या बॅटरी सेल्सचा समावेश आहे आणि यात एक बुद्धिमान बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आहे. जी कार्यक्षमतेचे निरीक्षण करणे, सेल्स संतुलित करणे आणि जमिनीवरील ऑपरेटर्सना बॅटरीच्या आरोग्याविषयी माहिती प्रसारित करण्यास सक्षम आहे.
ही बॅटरी कठोर परिस्थितींसाठीही तयार
अंतराळातील कठोर परिस्थितीसाठी तयार करण्यात आलेल्या या बॅटरीमध्ये ‘उष्णता नियंत्रण प्रणाली’ (थर्मल मॅनेजमेंट सिस्टम) देखील अंतर्भूत आहे. यामुळे कक्षेतील अति-थंडीच्या काळातही तिला कार्यरत ठेवते. क्यूबसॅट्स आणि मायक्रोसॅटेलाइट्सना ऊर्जा देण्यासाठी अनेक पॉवरबँक-५० युनिट्स एकावर एक रचता येतात. यांचा कार्यकाळ पृथ्वीच्या निम्न कक्षेत पाच वर्षांपर्यंतचा असतो. कक्षेतील यशस्वी पडताळणी हा ‘टेकमीटूस्पेस’ ही कंपनी पुढच्या पिढीची कक्षीय संगणन पायाभूत सुविधा विकसित करत आहे.