नवी दिल्ली,
Shahzad Poonawalla news भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या राजकीय भवितव्याबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील त्यांच्या प्रोफाइलमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, पक्षाकडून किंवा स्वतः शहजाद पूनावाला यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.शहजाद पूनावाला यांनी त्यांच्या 'एक्स' प्रोफाइलमधून भारतीय जनता पक्षाचा उल्लेख हटवला आहे. मात्र, त्यांनी स्वतःचा उल्लेख "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजीवन अनुयायी" असा कायम ठेवला आहे. गुरुवारी त्यांनी हा बदल केल्याचे समोर आले असले तरी त्यामागील कारण त्यांनी जाहीर केलेले नाही.

माध्यमांतील वृत्तांनुसार, शहजाद पूनावाला यांनी वैयक्तिक कारणांमुळे भाजप नेतृत्वाकडे राजीनामा सादर केला आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप भाजपकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच पूनावाला यांनीही सार्वजनिकरित्या राजीनाम्याची पुष्टी केलेली नसल्याने या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.शहजाद पूनावाला यांनी २०१७ मध्ये काँग्रेसचा निरोप घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमधील संघटनात्मक निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि पुढे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून जबाबदारी स्वीकारली.
गेल्या काही महिन्यांपासून पूनावाला त्यांच्या 'एक्स' खात्यावर जुने व्हिडिओ आणि मुलाखती शेअर करत होते. या व्हिडिओंमधून सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू होती. जानेवारी २०२५ मधील एका व्हिडिओत त्यांनी निवडणूक जिंकणे हेच समाजसेवेचे एकमेव माध्यम नसल्याचे सांगितले होते. खासदार न होता देखील देशासाठी योगदान देता येते, असे त्यांचे मत होते.दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर सक्रिय राजकारणातून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. मात्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा, बिहार आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या निवडणुकांपर्यंत ते सक्रिय राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, सोशल मीडियावर पूनावाला यांच्या भाजपमधून बाहेर पडण्याच्या चर्चांना वेग आला असला, तरी पक्ष किंवा स्वतः पूनावाला यांच्याकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे अधिकृत घोषणेनंतरच त्यांच्या राजीनाम्याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.