शेगावच्या पेढ्यांमध्ये भेसळ; विक्रेत्यांवर कारवाईची तयारी

दोन नमुने असुरक्षित : नागपूर प्रयोगशाळेच्या अहवालाने शिक्कामोर्तब

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
शेगाव,
shegaon-news : शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यांमध्ये भेसळ झाल्याचे नागपूर येथील अन्न प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मंदिर परिसरातील दोन पेढा विक्री केंद्रांतून जप्त करण्यात आलेले नमुने तपासणीत असुरक्षित आढळले असून, संबंधित विक्रेत्यांवर परवाना निलंबनासह न्यायालयीन कारवाई करण्याची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासनाने सुरू केली आहे.
 
 
 
PEDHA
 
 
 
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या महिन्यात मंदिर परिसरातील दोन पेढा विक्री केंद्रांवर छापे टाकून सुमारे २५ किलो पेढे जप्त केले होते. तपासणीसाठी हे नमुने नागपूर येथील अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. महिनाभरानंतर प्राप्त झालेल्या अहवालात दोन्ही नमुने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे निष्पन्न झाले.
 
 
प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, एका दुकानातील पेढ्यांच्या नमुन्यात फॉरेन फॅट (पामतेल) वापरल्याचे आढळून आले. दुधावर आधारित पेढ्यासारख्या उत्पादनामध्ये अशा प्रकारच्या पामतेलाचा वापर अन्न सुरक्षा नियमांनुसार ग्राह्य धरला जात नाही.
तर दुसऱ्या दुकानातील पेढ्यांच्या नमुन्यात कृत्रिम खाद्यरंगाचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोन्ही नमुने असुरक्षित ठरविण्यात आले आहेत.
 
 
पेढ्यांच्या नमुन्यांचा प्रयोगशाळा अहवाल रखडल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेतली. अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नोटीस बजावणे, परवाना निलंबित करणे आणि न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत शेगावमध्ये ही कारवाई करण्यात आली होती. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर आता संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
 
 
सहआयुक्त म्हणाले...
 
 
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले, "प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असून, दोन्ही नमुने असुरक्षित आढळले आहेत. संबंधित विक्रेत्यांना नोटीस बजावून परवाना निलंबित करण्याबरोबरच न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे."