नवी दिल्ली,
Suvendu Adhikari on Jaish's target पश्चिम बंगालमध्ये दहशतवादी कटाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या संशयावरून राज्याच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) जैश-ए-मोहम्मद (JeM) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित हमीद मंडल याला अटक केली आहे.एसटीएफने बर्दवान येथील रेनेसान्स टाऊनशिप परिसरातील एका फ्लॅटमधून हमीद मंडलला ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संशयित दहशतवाद्याकडून मिळालेल्या मोबाईल फोन आणि काही कागदपत्रांच्या तपासणीत मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावर हल्ल्याच्या कथित कटाशी संबंधित माहिती समोर आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.


पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, हमीद मंडल हा जैश-ए-मोहम्मदचा सदस्य असून तो जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार सज्जाद भट याचा जवळचा सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेला हमीद मंडल गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बर्दवान परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.या प्रकरणाचा तपास सध्या बंगाल एसटीएफकडून सुरू आहे. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील चौकशीसाठी त्याची कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा आरोपीचे नेटवर्क, त्याचे संपर्क आणि कथित कारवायांशी संबंधित सर्व बाजू तपासत आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये यापूर्वीही मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. बीरभूम जिल्ह्यातील नलहाटी परिसरातील एका बेवारस घरातून पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात स्फोटके हस्तगत केली होती. या कारवाईत ८०० किलोहून अधिक अमोनियम नायट्रेट, १,२०० हून अधिक जिलेटीनच्या कांड्या, १०५ डेटोनेटर्स आणि ३६ डेटोनेटिंग फ्यूज कॉइल्स जप्त करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी राज्यातील संशयास्पद हालचालींवर लक्ष केंद्रित केले असून, जैश-ए-मोहम्मदशी संबंधित नेटवर्कचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.