दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद!

-वडकी-पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर -पुलाची उंची वाढवा, नागरिकांचे जीव वाचवा -सरपंच रवींद्र चौधरींचा लोकप्रतिनिधींवर घणाघात

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
road-closes-when-there-is-a-flood : तालुक्यातील वडकी गावाला लागून असलेल्या पिंपळापूर मार्गावरील नाल्याला गुरुवारी आलेल्या पुरामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जात असल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना दोन्ही बाजूंना तासनतास अडकून पडावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासन व लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 
 
 
y31July-Wadaki-Pool
 
 
 
वडकी, पिंपळापूर व वडगाव येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
 
 
गुरुवारी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली. शाळेतून परतणारे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व इतर नागरिकांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
 
 
या पृष्ठभूमिवर पिंपळापूरचे सरपंच रवींद्र चौधरी यांनी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघात केला. दरवर्षी हाच प्रकार घडतो. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे काहीच सोयरसुतक नाही. केवळ आश्वासनांची खैरात केली जाते, मात्र पुलाची उंची वाढविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
 
 
पुलाची उंची वाढविल्यास दरवर्षी उद्भवणारी ही गंभीर समस्या कायमची निकाली निघू शकते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकèयांचे आर्थिक नुकसान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणनेआहे.
 
 
आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या पुलाच्या उंचीवाढीचा निर्णय घ्यावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.