तभा वृत्तसेवा
राळेगाव,
vadki-crossroads : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील वडकी येथील राळेगाव चौफुली परिसरातील सेवा मार्गाची अवस्था अक्षरशः तलावासारखी झाली आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचल्याने संपूर्ण सेवामार्ग जलमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाèया नागरिकांना व वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाट काढावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी प्रत्येक पावसाळ्यात याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. रस्ता खड्ड्यांनी भरतो, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मात्र यावर उपाय होताना दिसत नाही.
सेवा मार्गावरील मोठमोठे खड्डे पावसाच्या पाण्याखाली पूर्णपणे झाकले जात असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाजच येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. चारचाकी वाहनेही अडकत असून, पादचाèयांचीही मोठी गैरसोय होत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
रस्त्यावर साचलेले पाणी, तुटलेला सेवामार्ग व खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे हा परिसर अपघातांना निमंत्रण देत आहे. दररोज शेकडो वाहने या मार्गाचा वापर करतात. तरीही कायमस्वरूपी निचèयाची व्यवस्था, सेवा मार्गाची दुरुस्ती व खड्डे बुजविण्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी व मागण्या केल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.