हिंगणघाट,
samir-kunawar : शासन आपल्या दारी, लाभ प्रत्येकाच्या घरी हा राज्य शासनाचा संकल्प प्रत्यक्षात साकार करत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली ’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात २,६०४ लाभाथ्र्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळाला. आ. कुणावार यांनी असेच समाधान शिबिर आयोजित केले होते. त्या कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. कुणावार यांना ‘कार्यसम्राट’ म्हणून संबोधले होते, हे उल्लेखनिय!

या शिबिराच्या माध्यमातून हिंगणघाट मतदारसंघातील तब्बल २,६०४ लाभाथ्र्यांना आमदार कुणावार यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ, अनुदानाचे धनादेश, प्रमाणपत्रे, स्वामित्व सनद, पट्टे, मंजुरीपत्रे तसेच आवश्यक कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबिरात सर्वांसाठी घरे योजना, नजुल फ्री-होल्ड पट्टे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत प्रकरणे,प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्रे, शेतकर्यांना मागील वर्षी मिळालेल्या कृषी यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टरचे अनुदान वाटप, वन विभागामार्फत जीवितहानी व इतर विविध लाभांचे धनादेश वितरित करण्यात आले.
यावेळी आ. कुणावार म्हणाले की, शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्येक पात्र लाभाथ्र्यापर्यंत वेळेत आणि सन्मानाने पोहोचल्या पाहिजेत, ही राज्य शासनाची भूमिका आहे. नागरिकांना विविध कार्यालयांचे वारंवार मारावे लागू नयेत, त्यांच्या महसुली आणि प्रशासकीय समस्या तातडीने मार्गी लागाव्यात, तसेच ’शासन आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, यासाठी अशा महसूल समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिरास नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, उपनगराध्यक्ष निलेश ठोंबरे, किशोर दिघे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय डेहणे, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थिती होती.