तभा वृत्तसेवा
मारेगाव,
gurudev-devotees : आषाढी वारीनंतर लाखो वारकèयांच्या उपस्थितीमुळे चंद्रभागा नदी परिसरात निर्माण झालेली अस्वच्छता दूर करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गीताचार्य तुकाराम दादा व संत गाडगेबाबा यांच्या अनुयायांनी पुन्हा एकदा श्रमदानाचा आदर्श घालून दिला. पंढरपूर येथील सांगोला मार्गावरील ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर संस्थेच्या वतीने सलग 11 व्या वर्षी चंद्रभागा स्वच्छता अभियान 27 ते 29 जुलै कालावधीत राबविण्यात आले.
महाराष्ट्राच्या कानाकोपèयातून आलेले शेकडो गुरुदेव भक्त स्वखर्चाने या अभियानात सहभागी झाले होते. या अभियानात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला.
पंढरीत आषाढी व कार्तिकी वारीदरम्यान लाखो भाविक दाखल होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण होते. मात्र, प्रत्येक वारकèयाने स्वतःकडून कोणत्याही प्रकारची घाण होणार नाही, असा संकल्प केला तर अस्वच्छतेच्या राक्षसाचा कायमचा नायनाट होऊ शकतो, हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा उपक्रम संस्थेचे संचालक सेवकराम मिलमिले यांच्या मार्गदर्शनात पार पडला. कानडा येथील सरपंच सुषमा ढोके, सूरज येवले, दिवाकर गाडगे, नामदेव येडे, कवडू वडस्कर, भूषण ढोबळे, गजानन घुमणर, स्वच्छतादूत कमला कावळे, सुरेश चौधरी, अनिता ढेंगळे, सुमन आवारी, हरिभाऊ शिंदे, रुपेश ढोके, प्रा. सुरेंद्र नावडे यांच्यासह शेकडो गुरुदेव भक्तांनी श्रमदान केले.
या अभियानासाठी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन देठे व सचिव दिलीप भोयर यांचे सहकार्य लाभले.