जिल्ह्यातील ३ तालुके अन् ४३ मंडळांत अतिवृष्टी

२४ तासांत ८९.०३ मिमी पाऊस

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
वर्धा,
heavy-rainfall : पावसाने गुरूवारी जिल्ह्यात चांगलाच कहर केला. रात्रीही पावसाचा कमी अधिक जोर कायम राहिल्याने नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ८९.०३ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून जिल्ह्यातील ३ तालुक्यातील ५२ पैकी तब्बल ४२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंदही प्रशासनाने घेतली आहे. सर्वाधिक पाऊस देवळी तालुक्यात झाला.
 
 

J 
 
 
 
जिल्ह्यात काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जुलै महिन्याचा कोटाच अखेरच्या दिवसांत पावसाने पूर्ण केला. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात २९९.०८ मिमी म्हणजेच १०९.६ टक्के पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ८९.०३ मिमी पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम जलाशय अजूनही फुल्ल झालेले नाही.
जिल्ह्यात वर्धा : ११९ मिमी, सेलू : १०९.०९ मिमी, देवळी : ११९.०२ मिमी, आर्वी : ८४.०८ मिमी, आष्टी : १९.०७ मिमी कारंजा : ४६.०४ मिमी, हिंगणघाट : ७६.०१ मिमी, समुद्रपूर : १०३ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.
२८६ घरं, १० गोठ्यांचे नुकसान
 
 
मुसळधार पावसामुळे २८६ घर आणि १० गोठ्यांचे नुकसान झाले. तर दोन जनावरांचा मृत्यू झाला. देवळी तालुक्यात ५ जणांना सुरक्षीत ठिकाणी हलवावे लागले होते. पूरपरिस्थिती ओढावल्याने देवळी तालुक्यातील आंजी-अंदोरी, वर्धा-राळेगाव, आलोडा बोरगाव, भोजनखेडा-तळेगाव, देवळी-पुलगाव, वाबगाव-हुस्नापूर, रायपूर-अंदोरी, हिंगणघाट तालुक्यातील अलमडोह-अल्लीपूर, वर्धा तालुक्यातील वायगाव-राळेगाव, बोदड-पुलगाव यासह रोठा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. वर्धा व सेलू तालुक्यात प्रत्येकी एक जनावराचा मृत्यू झाला. देवळी तालुक्यात २९ घरं, वर्धा तालुक्यातील २७ घर व पाच गोठे, सेलू तालुक्यातील १५१ घरं, देवळी तालुक्यातील २५ घरं तर २ गोठे, हिंगणघाट तालुक्यातील ५२ घरं आणि तीन गोठे तसेच समुद्रपूर तालुक्यातील २२ घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
जलाशयांतील पाणी पातळीत नाममात्र वाढ
 
बोर प्रकल्प : ६६.६२ टक्के
निम्न वर्धा : ७४.५८ टक्के
धाम प्रकल्प : ५८.९१ टक्के
पोथरा प्रकल्प : ६१.१० टक्के
पंचधारा प्रकल्प : ३०.९७ टक्के
डोंगरगाव प्रकल्प : ३६.९७ टक्के
मदन प्रकल्प : ४५.२० टक्के
लाल नाला : ४५.०४ टक्के
वर्धा कार नदी प्रकल्प : ६५.६६ टक्के
सुकळी लघु प्रकल्प : १८.०५ टक्के