गोरेगाव,
anganwadi-in-ghoti : येथील महिला व एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अंतर्गत जवळच्या घोटी येथील अंगणवाडी क्रमांक-3 मध्ये अंगणवाड्यांचा संयुक्त ‘वेलकम मेळावा’ शुक्रवारी 31 जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी प्रथमच अंगणवाडीत दाखल झालेल्या चिमुकल्यांचे तिलक लावून, पुष्पवृष्टी करून आणि स्नेहपूर्ण स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य प्रिती कतलाम होत्या. यावेळी माजी जि.प. सभापती विश्वजीत डोंगरे, पर्यवेक्षिका अहिल्या शेेंद्र, मुख्याध्यापक उमराव डोलारे यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिस, पालक वर्ग व गावकरी उपस्थित होते. प्रसंगी जि.प. सदस्या कतलाम यांनी अंगणवाडी ही बालकांच्या जीवनातील पहिली पाठशाळा असून येथे शिक्षणासोबतच संस्कार, पोषण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा भक्कम पाया रचला जातो असे सांगत पालकांनी आपल्या पाल्यांना नियमितपणे अंगणवाडीत पाठवावे, असे आवाहन केले. डोंगरे यांनी निरोगी, सुशिक्षित आणि सुसंस्कारित समाज घडविण्यात अंगणवाड्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील बालकांचे भविष्य घडविण्यासाठी अंगणवाडी सेविका समर्पित भावनेने कार्य करीत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. मुख्याध्यापक डोलारे यांनी अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमधील समन्वय अधिक बळकट झाल्यास मुलांचा शैक्षणिक पाया अधिक मजबूत होईल, असे स्पष्ट केले. यावेळी नवप्रवेशित बालकांचे स्वागत करण्यात आले तसेच पालकांना बालपोषण, आरोग्य, प्रारंभिक शिक्षण आणि नियमित उपस्थितीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.